Sunday, March 22, 2020

सुखसमृद्धी आणि आरोग्य संपन्न गुणांनी नटलेला सण गुढीपाडवा

गुढीपाडवा सादर करण्यामागच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. महाभारतातील आदिपर्वात इंद्राने उपरीचर राजाला कळकाची काठी दिली. ती काठी त्या राजाने जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाचा प्रारंभ करून त्या काठीची पूजा केली. गुढीपाडवा हा भारतातील हिंदु धर्मीयांचा सण असून ते लोक हा सण हिंदु दिनदर्शिकेतील चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र सहीत भारतातील इतर प्रदेशातून हा सण साजरा केला जातो. भारताच्या अनेक भागात  हिंदू लोक गुढीपाडवा विविध नावाने साजरा करतात. महाराष्ट्रात गुढीपाडवा तर कर्नाटकात युगादी, तामिळनाडू येथे पुंथंडु, आंध्रप्रदेश येथे उगादी, आसाम येथे बिहू, केरळ येथे विशु, पंजाब येथे बैसाखी अश्या विविध नावाने गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याला हिंदु कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. वेदांमध्ये असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने या दिवशी  विश्वनिर्मिती केलीब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ घोषित केली म्हणून या तिथीला पहिले पद मिळाले आणि त्यामुळेच तिला प्रतिपदा असे संबोधले जाते. तसेच चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करत प्रभू श्रीराम यांनी लंकापती रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली आणि ते लक्ष्मण, सीता, हनुमान आणि इतर वानर सेनेसोबत याच दिवशी अयोध्येला परतले त्यादिवशी तेथील नागरिकांनी गुढी उभारून त्यांच्या आगमनाचा उत्सव साजरा केला अशी समजूत आहे.

मानवी इतिहासात विविध समुदायातील लोकांकडून  काठीपूजन ही प्राचीनतम् पूजा परंपरा साजरी केली जात असे. ही पूजा आज तागायत गुडीपाडवा या नावाने  नवीन वर्षातला पहिला सण म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महाराष्ट्रात तसेच इतर भागातील मराठी बांधव स्नान आणि इतर दैनंदिन कार्ये करून आपल्या घरात उंचावर गुढी उभारतात. या गुढीला विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. उंच बांबूची काठी उभारली जाते त्यालाच गुढी असेम्हटले जाते. तीबांबूची काठी स्वछ धुतली जाते. त्या गुढीवर लाल, गुलाबी, निळा, भगवा, हिरवा, जांभळा अश्या विविध रंगांचे सुंदर रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळली जाते. त्यावर कडुनिंबाची आणि आंब्याची पाने, फुलांचा हार आणि आणि साखरेची गाठ बांधून  लावली जाते. त्यावर तांबे, पितळ, चांदी, स्टील या धातूंचा तांब्या किंवा फुलपात्र बसवले जाते. ज्याठिकाणी  गुढी उभारायची असते ती जागा केरकचरा काढून स्वछ केली जाते आणि पाट मांडून गुढी उभा केली जाते. त्या पाटाभोवती  रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. गुढीसमोर निरंजन लावून अगरबत्ती लावली जाते. गुढीला गंध, फुले आणि अक्षता वाहून दूध, पेढा, साखर, पुरणपोळी आणि गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून गणपती, लक्ष्मी आणि इतर देवीदेवतांचे नामस्मरण करून कुटुंबाच्या समवेत सकाळी गुढीची पुजा केली जाते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हळद कुंकु आणि अक्षता वाहून ती गुढी उतारली जाते. यादिवशी वडीलधाऱ्यांना, आतेष्टांना, जेष्ठांना, वंदन केले जाते आणि शेजारी मित्रांना, लहान मुलांना नववर्षाचे अभिष्टचिंतन करून  आनंद सोहळा साजरा केला जातो.

" दारात आमुच्या उभारली हो गुढी 
                                  विजय समृद्धीसंगे आली हो आली 
                                  आमुच्या घरीदारी नववर्षाची स्वारी
                                  चला नव्याने घेऊया गगनभरारी "

                                    
 आरोग्यतील गुढीपाडव्याचे महत्व:- 

भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण आणि त्या सणादिवशी सेवन केल्या जाणारे  पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण ठरतात. सकाळ सकाळी चैत्रशुद्ध प्रतिभेला उष्ण तापमानात शरीराला शितल करण्यासाठी कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालून अभ्यंगस्नान  केले जाते. यामुळे त्वचारोगही बरे होतात. अनेक औषधी गुण असलेल्या कडुनिंबाची पाने, ओवा, मीठ, मिरी, हिंग, साखर एकत्रित वाटून खाल्ले जातात. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, पित्तमय प्रकृतीचा नाश होतोबदलत्या ऋतुमानानुसार भारतीय संस्कृतीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये त्या ऋतूमनानुसार शरीराला पौष्टिक असणारे पदार्थ बनवले जातात


गुढीपाडव्याचे इतर वैशिष्ठ्यपूर्ण महत्व:-

गुढीपाडव्यादिवशी सर्व हिंदु बांधव एकत्रित येतात. हा सोहळा साजरा करण्यासाठी पारंपरिक मिरवणुक काढल्या जातात. या सोहळ्यात लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशभूषा परिधान करून या मिरवणुकीच्या सोहळ्यात सहभागी होतात. अश्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. या शुभदिनानिमित्त "नववर्षाची पहाट" यासारख्या मैफिली सकाळ सकाळी रंगवल्या जातात. गुढीपाढव्यादिवशी पानपोई घातली जाते. तसेच पाण्याने भरलेल्या घड्याचे दान केले जाते. वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन शुभ मुहुर्थांपैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त असलेला दिवस आहे. या दिवशी नवीन कार्यासाठी श्री गणेशा केला जातो  तसेच नवीन वस्तू, सोने, चांदी, वाहने यांची मोठ्या प्रमाणांत खरेदी केली जाते

भारतीय संस्कृतीमधील सगळे सण अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले आहेत. प्रत्येक सणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रथा आणि पदार्थ हे नैसर्गिक आणि आरोग्याच्या दृष्टीने बहुमूल्य आहेत. आपली परंपरा, संस्कृती आणि आरोग्य जपण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय संस्कृतीतील वैविध्यतेने नटलेले सण मोठ्या गर्वाने साजरे केले पाहिजेत

                                                                 Penned By: Ankita Kadam

Comment for Blog
EmoticonEmoticon